---Advertisement---

शेगावात ‘गणराया पुरस्कार २०२६’ची घोषणा; प्रथम क्रमांकासाठी ५१ हजारांचे पारितोषिक!!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरातील गणेशोत्सव अधिक शिस्तबद्ध, पर्यावरणपूरक, समाजप्रबोधनपर तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा व्हावा, या उद्देशाने मोतीबाग व्यायाम प्रसारक व बहुउद्देशीय संस्था, नागरी हक्क संरक्षण समिती, गो ग्रीन फाउंडेशन, युवा क्रांती संघटना आणि पतंजली योग समिती, शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. दिलीपबापू अजाबराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘गणराया पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नसून प्रवेश पूर्णतः विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

या स्पर्धेतील विजेत्या मंडळाला आकर्षक ढाल आणि रोख ५१ हजार रुपये, तर ‘सिद्धीविनायक पुरस्कार २०२६’ विजेत्या मंडळाला आकर्षक चषक व ११ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. शेगाव शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बंधुभाव, शिस्त, पर्यावरण संवर्धन आणि समाजप्रबोधनाची भावना वाढीस लागावी तसेच पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने २०२३ पासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

स्पर्धेसाठी एकूण १०० गुणांचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. गणेशमूर्तीची स्थापना करताना शिस्त व वेळेसाठी ५ गुण, दहा दिवस मंडप व परिसराची सुरक्षा, स्वच्छता आणि निर्माल्य विल्हेवाटीसाठी ५ गुण, मंडप व परिसराच्या सुरक्षेसाठी ५ गुण, सकाळ-संध्याकाळ आरतीची पद्धत व वेळेसाठी ५ गुण देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय एकात्मता, समाजप्रबोधनपर देखावे आणि लोकोपयोगी उपक्रमांसाठी २० गुण, तर विसर्जन मिरवणुकीतील पदाधिकाऱ्यांची वागणूक, शिस्त आणि वेळेसाठी सर्वाधिक ३० गुणांचे मूल्यांकन केले जाणार आहे. ध्वनीप्रदूषण नियंत्रण, वाद्यांचा प्रकार, समाजप्रबोधन, राष्ट्रीय संदेश, सामाजिक एकोपा, वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक देखावे यासाठीही ३० गुण निश्चित करण्यात आले आहेत.

दरम्यान, स्थापना किंवा विसर्जन मिरवणुकीत DJ आणि Laser Light वापरणाऱ्या मंडळांची या पुरस्कारासाठी दखल घेतली जाणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पारंपरिक वाद्यांचा वापर, शिस्तबद्ध मिरवणूक आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला यंदा विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

स्थापनेच्या दिवसापासून मुख्य विसर्जन मिरवणुकीपर्यंत निरीक्षण समितीकडून मंडळांचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात येणार आहे. प्रत्येक निकषानुसार गुण देण्यात येतील. कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी किंवा झुकते माप दिले जाणार नसून, विजेत्या मंडळाचे गुण सार्वजनिक करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. तहसीलदार यांच्या उपस्थितीत गुणांची बेरीज करून अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.

विजेत्या मंडळांचा सन्मान नवरात्र उत्सवानिमित्त शेगाव पोलीस स्टेशनमध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीत मान्यवर अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ढाल, चषक आणि रोख पारितोषिक देऊन करण्यात येणार आहे.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा उपक्रम ठरावा, यासाठी मंडळांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, व्यसनमुक्ती जनजागृती, स्वच्छता अभियान, ओला-सुका कचरा व्यवस्थापन, डेंग्यू निर्मूलन, प्लास्टिकमुक्ती आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या लोकोपयोगी उपक्रमांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या पुरस्कारासाठी डॉ. जयंतराव खेळकर अध्यक्ष, प्रवीण सुरोसे सरचिटणीस, महसूल प्रतिनिधी आर.डी. राठोड, पोलिस प्रतिनिधी गजेंद्र रोहनकर, नगरपरिषद प्रतिनिधी समाधान जायभाये, वकील प्रतिनिधी ॲड. अनंत भटकर, डॉक्टर प्रतिनिधी डॉ. शशिकांत जोशी, प्राध्यापक प्रतिनिधी प्रशांत कराळे, पत्रकार प्रतिनिधी धनराज ससाणे व समीर देशमुख, मोतीबाग तालीम प्रतिनिधी महेश देशमुख व अशोक गडकर, नागरी हक्क संरक्षण समिती प्रतिनिधी विजय ढगे व उमेश देशमुख, युवा क्रांती संघटना प्रतिनिधी चंद्रकांत घोराळे, गो ग्रीन प्रतिनिधी विठ्ठलराव मिरगे व प्रल्हाद साबे, तसेच पतंजली योग समिती प्रतिनिधी सुलताने सर व निळकंठ साबळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा निरीक्षण समितीत समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment