शेगाव |(युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरात अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली असून अवैधरित्या तांदूळ व मका साठवून खरेदी-विक्री करणाऱ्या पाच व्यापाऱ्यांविरुद्ध शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत 490 किलो तांदूळ, 50 किलो मका असा एकूण ₹22,170 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शेगाव शहर पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 च्या कलम 3 व 7 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष चिंतामन बावने (वय 47, रा. एसबीआय कॉलनी, शेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जुलै 2026 रोजी सकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास तहसीलदारांच्या मौखिक आदेशानुसार मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पुरवठा निरीक्षक स्वप्निल गावंडे, पोलीस अंमलदार विनोद वाघमारे व दोन पंचांसह सईबाई मोटे सामान्य रुग्णालयासमोरील परिसरात छापा टाकण्यात आला.
या कारवाईदरम्यान टिनपत्राच्या दुकानांमध्ये अवैधरित्या तांदूळ व मका साठवून त्याची खरेदी-विक्री सुरू असल्याचे आढळून आले. तपासादरम्यान आरोपींकडून खालीलप्रमाणे धान्य जप्त करण्यात आले.
- दिलीप द्वारकादास गांधी – 50 किलो तांदूळ व 50 किलो मका
- आनंद जगदीश चौधरी – 130 किलो तांदूळ
- विजय राधेश्याम अग्रवाल – 30 किलो तांदूळ
- राजेश गोपालदास खेतान – 200 किलो तांदूळ
- दिपक गोडोदिया – 80 किलो तांदूळ
या कारवाईत 490 किलो तांदूळ (किंमत ₹21,070) आणि 50 किलो मका (किंमत ₹1,100) असा एकूण ₹22,170 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेंद्रसिंग चव्हाण करीत आहेत.









