शेगाव (डी ललित) : शेगाव शहरातील नागझरी येथील नागोजी महाराज मंदिर परिसरातून 35 वर्षीय लंकेश्वर अजाबराव टेकाम बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात कायम मिसिंग क्रमांक 59/2026 नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लंकेश्वर टेकाम हा 23 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 2 ते सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान नागोजी महाराज मंदिर परिसरातून बेपत्ता झाला. सकाळी 6 वाजता त्याचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही. त्यानंतर नागझरी परिसर तसेच शेगाव शहरात नातेवाईक व परिचितांनी शोध घेतला, मात्र अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.
बेपत्ता व्यक्तीचे वर्णन :
लंकेश्वर अजाबराव टेकाम, वय 35 वर्षे, रंग काळा, मध्यम बांधा, उंची अंदाजे 6 फूट 2 इंच. अंगात चॉकलेटी रंगाचा चौकडीचा शर्ट आणि क्रिम रंगाची पॅन्ट परिधान केलेली आहे.
या प्रकरणी 25 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2.12 वाजता शेगाव शहर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेका विनायक सरोदे करीत आहेत.
लंकेश्वर टेकाम यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास शेगाव शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)







