शेगाव | (डी ललित) : शेगाव शहरातील पेठ मोहल्ला परिसरात मांस विक्रीप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया केल्या. या कारवायांमध्ये चार जणांकडून मिळून अंदाजे 105 किलो मांस आणि चार मोठे सुरे जप्त करण्यात आले असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 21 हजार 400 रुपये असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 ऑगस्ट 2026 रोजी पेठ मोहल्ला परिसरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकांनी पंचांसह घटनास्थळी जाऊन दोन्ही ठिकाणी कारवाई केली.
पहिल्या कारवाईत 60 किलो मांस जप्त
पहिल्या कारवाईत शेख गफ्फार शेख उस्मान (वय 47) याच्याकडून प्लास्टिक कॅरेटमध्ये अंदाजे 30 किलो मांस व एक मोठा सुरा आढळून आला. त्यानंतर शेख वाहीद शेख महेबुब (वय 41) याच्याकडूनही अंदाजे 30 किलो मांस व एक मोठा सुरा जप्त करण्यात आला.
या कारवाईत एकूण 60 किलो मांस व दोन सुरे, असा 12 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदिप महादेवराव बारींगे यांच्या फिर्यादीवरून अप क्रमांक 504/2026 दाखल करण्यात आला आहे.महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 मधील कलम 5(अ), 5(क), 9 (प्रथम सुधारणा 2015) तसेच भारतीय न्याय संहिता कलम 325 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत 45 किलो मांस जप्त
दुसऱ्या कारवाईत मोहम्मद अरसलान शेख मुनीर (वय 40) याच्याकडून प्लास्टिक कॅरेटमध्ये अंदाजे 25 किलो मांस व एक मोठा सुरा जप्त करण्यात आला. तर शेख बिलाल शेख इसाक याच्याकडून अंदाजे 20 किलो मांस व एक मोठा सुरा जप्त करण्यात आला.
या कारवाईत एकूण 45 किलो मांस व दोन सुरे, असा सुमारे 9 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र दशरथ पवार यांच्या फिर्यादीवरून अप क्रमांक 505/2026 दाखल करण्यात आला आहे.या दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 मधील कलम 5(अ), 5(क), 9 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 325 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावंडे करीत असून, त्यांना पोलीस कर्मचारी गजानन डाबेराव यांचे सहकार्य आहे. कारवाई पोलीस निरीक्षक मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे पोलिसांच्या अहवालात नमूद आहे.
दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक नोंदीत जप्त मांस गोवंश जातीचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या संदर्भातील अंतिम निष्कर्ष तपास आणि आवश्यक न्यायवैद्यकीय प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)








