शेगांव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील पेठ मोहल्ला परिसरात मुलांच्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुफान वाद होऊन मारहाण आणि दगडफेक झाल्याची घटना घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलिस ठाण्यात 10 जणांसह इतर 5 ते 6 अनोळखी व्यक्तींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख मजिद शेख इसाक (वय 32, रा. पेठ मोहल्ला, शेगाव) हे घरी असताना आरोपींनी घरात घुसून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी “घरात कसे आलात?” असा जाब विचारल्यावर आरोपी सैयद नबाब याने हातातील दगड फिर्यादीच्या डोक्यात मारल्याने ते जखमी झाले व त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव झाला.
दरम्यान, फिर्यादीचे भाऊ भांडण सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपींनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घराबाहेर येऊन घरासमोर विटा व दगडफेक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमे तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास GPSI गजानन गावंडे हे करीत आहेत.








