---Advertisement---

Shegaon News : भोईपुरा-भिमनगरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था; नागरिकांची नगर परिषदेकडे तक्रार!!

---Advertisement---

शेगांव, (युवा क्रांती वृत्तसेवा) दि. ८ सप्टेंबर : शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील भोईपुरा व भिमनगर, नागझरी रोड परिसरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. शौचालयांची नियमित साफसफाई, देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी ८ सप्टेंबर २०२६ रोजी शेगांव नगर परिषद कार्यालयातील मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे. या अर्जावर अमोल गो. शेगोकार, हर्षल अनिल राजगुरे, तेजस गणेश वाघमारे, विशाल कैलास फुके यांच्यासह असंख्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

तक्रार अर्जानुसार, प्रभाग क्रमांक ३ मधील भोईपुरा व भिमनगर परिसरातील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक शौचालयांकडे गेल्या काही वर्षांपासून पुरेसे लक्ष देण्यात आले नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. शौचालयांची दुरुस्ती तसेच नियमित देखभाल होत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, दोन सार्वजनिक शौचालये ब्लॉक/जाम झाल्याने त्यामध्ये सांडपाणी साचून डासांची उत्पत्ती होत असल्याचा दावा तक्रारदार नागरिकांनी केला आहे. नियमित साफसफाई होत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन सार्वजनिक शौचालयांची तातडीने पाहणी करून दुरुस्ती, साफसफाई आणि नियमित देखभालीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. तसेच मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः संबंधित शौचालयांची पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, अशी विनंतीही तक्रार अर्जातून करण्यात आली आहे.

दरम्यान, तक्रारीवर ७ दिवसांच्या आत कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या वतीने नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तक्रार अर्जासोबत समस्याग्रस्त शौचालयांचे जीपीएससह छायाचित्रे जोडण्यात आल्याचेही नागरिकांनी नमूद केले आहे.

आता नगर परिषद प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून शौचालयांच्या दुरवस्थेवर तातडीने उपाययोजना करते का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment