---Advertisement---

जीआरपी शेगाव पोलिसांची तत्पर कारवाई; मोबाईल चोरी प्रकरणातील आरोपी मुद्देमालासह ताब्यात!!

---Advertisement---

शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : 11जून 2026 –मंडळ – भुसावळ अंतर्गत जीआरपी शेगाव पोलिसांनी मोबाईल चोरी प्रकरणात तत्पर कारवाई करत आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. सदर कारवाई दिनांक 11 जून रोजी करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, काही पुरुष व महिला प्रवासी शेगाव येथे दर्शनासाठी आले होते. यावेळी महिला प्रवासी सौ. सुरेखा किशोर मेशरे (वय 38 वर्षे) या झोपेत असताना त्यांच्या जवळील पर्स अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. सदर पर्समध्ये ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन किंमत अंदाजे 13 हजार 500 रुपये होता.

घटनेची माहिती मिळताच एएसआय रंजन तेलंग यांनी तत्काळ संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान दिनांक 10 जून रोजी रात्री 11.10 वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात इसम संबंधित महिलेची पर्स चोरी करताना स्पष्टपणे दिसून आला.

यानंतर फिर्यादी महिलेने जीआरपी शेगाव येथे अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 303(2) बीएनएस अंतर्गत प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल केला.

तपासाची सूत्रे वेगाने हलवत एएसआय रंजन तेलंग यांनी आरोपीचा फोटो खास मुखबिरास पाठवून माहिती संकलन सुरू केले. त्यानुसार दिनांक 11 जून रोजी पहाटे 1 वाजताच्या सुमारास आरोपी रेल्वे स्थानक परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी बुकिंग हॉल परिसरात सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव शरद भगवान शैरीसे (वय 35 वर्षे, रा. सैदपूर, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) असे सांगितले. तसेच त्याने संबंधित महिलेची पर्स व मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली.

त्यानंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक कागदपत्रांसह त्यास जीआरपी शेगाव यांच्या ताब्यात देण्यात आले. सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment