---Advertisement---

Shegaon News : विज्ञान प्रदर्शनात सेंट झेवियर्सच्या समृद्धी भारसाकळेची विभागातून प्रथम क्रमांकाची बाजी!!

---Advertisement---

तालुका व जिल्हास्तरावरील यशानंतर अमरावती विभागातही प्रथम क्रमांक; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र!

शेगाव (डी ललित) : सेंट झेवियर्स इंग्लिश स्कूल, शेगाव येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी समृद्धी भारसाकळे हिने ऑल इंडिया सायन्स एक्झिबिशन २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले असून, अमरावती विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे सेंट झेवियर्स इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

समृद्धीने विज्ञान प्रदर्शनात आपल्या प्रकल्पाचे प्रभावी सादरीकरण केले. या स्पर्धेत तिने प्रथम तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला. त्यानंतर बुलढाणा जिल्हास्तरीय स्पर्धेतही तिने द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर अमरावती विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी तिची निवड झाली. विभागीय स्तरावरही तिने आपल्या प्रकल्पाचे प्रभावी सादरीकरण करीत प्रथम क्रमांक मिळविला आणि महाराष्ट्र राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी पात्रता मिळविली.

समृद्धीच्या या यशाबद्दल सेंट झेवियर्स इंग्लिश स्कूलच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी फादर बेंजामिन यांनी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत समृद्धी भारसाकळे हिचा सत्कार करून तिचे अभिनंदन केले. तसेच विज्ञान प्रकल्पासाठी तिला मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक सय्यद आफाक सर यांचाही त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल फादर बेंजामिन यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

समृद्धीच्या यशामध्ये तिची मेहनत, जिद्द आणि वैज्ञानिक दृष्टिकोनासोबतच विज्ञान शिक्षक सय्यद आफाक सर यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि योग्य दिशा यांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे यावेळी गौरवोद्गार काढण्यात आले.

विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाकडे केवळ अभ्यासाचा विषय म्हणून न पाहता त्यामध्ये संशोधनवृत्ती विकसित करावी आणि विविध विज्ञान प्रदर्शन व स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

समृद्धीच्या या यशाबद्दल शेगाव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातून तिचे कौतुक होत आहे. महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या समृद्धीला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक आणि संपूर्ण सेंट झेवियर्स परिवाराने शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेतही समृद्धी उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment