शेगाव | (डी ललित) : शेगाव शहरातील एमएसईबी चौक परिसरात एसटी बस आणि दुचाकीस्वारामध्ये झालेल्या वादाचे पडसाद शेगाव बसस्थानकापर्यंत उमटले. या प्रकरणात बस चालकाने दुचाकीला धडक देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूने एसटी चालक व कर्मचाऱ्यांशी मारहाण, धक्काबुक्की, शिवीगाळ आणि धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. दोन्ही तक्रारींवरून शेगाव शहर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
दुचाकीस्वाराची तक्रार; बस चालकावर गुन्हा
पोलिसांच्या नोंदीनुसार, १० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे ४.१५ वाजता एमएसईबी चौक ते राजलक्ष्मी पेट्रोल पंप परिसरात ही घटना घडली. फिर्यादी विनय लक्ष्मीचंदजी शाह (वय ५७, रा. एमएसईबी चौक, शेगाव) हे मोटारसायकलवरून जात असताना त्यांच्या मागून MH-14-NE-6031 क्रमांकाची एसटी बस आली.
विनय शाह यांच्या तक्रारीनुसार, बस चालक विजय रमेश घटटे यांनी बस भरधाव व निष्काळजीपणे चालवत त्यांच्या दुचाकीच्या दिशेने आणली. दुचाकी रस्त्याच्या कडेला घेतल्यानंतरही बस त्यांच्या जवळ आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर पेट्रोल पंपाकडे वळतानाही बसने दुचाकीला कट मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेनंतर शाह हे शेगाव बसस्थानकात तक्रार करण्यासाठी गेले असता तेथे एसटी कर्मचाऱ्यांकडून शिवीगाळ, धक्काबुक्की आणि धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महिला कर्मचाऱ्याने कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात कायमी गुन्हा दाखल करण्यात आला असून BNS कलम 281, 125(a), 115(2), 351(2), 296 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार श्याम आघाव करीत आहेत.
एसटी चालकाची तक्रार; विनय शाहसह सहा जणांवर गुन्हा
दरम्यान, एसटी चालक विजय रमेश घटटे (वय ३९, रा. गोपाळनगर, खामगाव) यांनीही पोलिसांत स्वतंत्र तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, ते MH-14-NE-6031 क्रमांकाची बस घेऊन खामगाव ते शेगाव प्रवासी वाहतूक करत होते.
एमएसईबी चौक परिसरात विनय शाह हे बुलेटवरून बससमोर आल्याने बसचा हॉर्न वाजवून साइड मागितली असता त्यांनी वाहन आडवे करून बस अडवली आणि चालकाच्या केबिनजवळ येऊन धक्काबुक्की केल्याचा आरोप घटटे यांनी केला आहे.
तसेच महिला वाहक यांना हात लावून ढकलल्याचा आणि अन्य एका आरोपीने त्यांचा हात पकडल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
घटनेनंतर बसस्थानकात चालक व कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचे तसेच सुमारे ८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी कायमी गुन्हा दाखल करण्यात आला असून विनय शाह, राहुल शाह, जनक शाह, शकील खान आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध BNS कलम 132, 115(2), 74, 75, 126, 351(2), 296, 189(2) आणि 190 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
CCTV फुटेज तपासाची मागणी
दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात गंभीर आरोप करण्यात आल्याने या प्रकरणातील एमएसईबी चौक, बसस्थानक आणि संबंधित मार्गावरील CCTV फुटेज महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. दोन्ही तक्रारींमध्ये CCTV फुटेजचा उल्लेख करण्यात आला असून पोलिसांकडून तपासादरम्यान फुटेज तपासले जाण्याची शक्यता आहे.
एकाच घटनेतून निर्माण झालेल्या या वादात दोन्ही बाजूंनी स्वतंत्र गुन्हे दाखल झाल्याने आता पोलिस तपासात नेमकी घटना कशी घडली, कोणाकडून काय प्रकार झाला आणि आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, हे स्पष्ट होणार आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)








