शेगाव | (डी ललित) : फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून तसेच प्रकार उघड केल्यास संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत एका स्टाफ नर्सवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी रोहित गजानन पहुरकर (वय ३२, रा. आम्रपाली नगर, शेगाव) याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला अकोला येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहेत. फेसबुकच्या माध्यमातून त्यांची आरोपी रोहित पहुरकर याच्याशी ओळख झाली होती. आरोपीने कौटुंबिक अडचणींचे कारण सांगून फिर्यादीची सहानुभूती मिळवली आणि त्यानंतर तिच्याशी जवळीक निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी आरोपीने आजोबांच्या आजारपणाचे कारण सांगून फिर्यादीला शेगाव येथे बोलावून घेतले. त्यानंतर शांततेत बोलण्याच्या बहाण्याने तिला खामगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. त्यानंतर सदर प्रकार कोणाला सांगितल्यास तसेच शेगाव येथे येण्यास नकार दिल्यास हा प्रकार तिच्या पतीला सांगून तिचा संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी आरोपीने दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सुरुवातीला अकोला येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, घटनास्थळ शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने पुढील तपासासाठी हा गुन्हा शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
गुन्ह्याची गंभीर दखल घेत शेगाव ग्रामीणचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण लिंगाडे यांनी अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासादरम्यान आरोपीला अटक करण्यात आली असून, न्यायालयाकडून त्याचा दोन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण लिंगाडे करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)







