शेगाव | (डी ललित) : श्री. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव येथे आलेल्या अमरावती येथील महिलेचा सुमारे ₹1 लाख किमतीचा iPhone 14 Pro Max मंदिर परिसरातून चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. भाग्यश्री पुष्पक लोहाना (वय 36, रा. सिद्धी विनायक कॉलनी, अमरावती) या आपल्या काकूंसोबत संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याकडे त्यांचा iPhone 14 Pro Max मोबाईल होता.
दर्शन झाल्यानंतर त्या मंदिराबाहेर आल्या असता मोबाईल त्यांच्या पर्समध्ये दिसून आला नाही. त्यानंतर त्यांनी मंदिर परिसर तसेच मंदिराबाहेर मोबाईलचा शोध घेतला. मात्र मोबाईल मिळून आला नाही. अज्ञात व्यक्तीने मोबाईल चोरून नेल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
चोरी झालेल्या मोबाईलची अंदाजे किंमत ₹1,00,000 असून त्यामध्ये Airtel कंपनीचे SIM कार्ड असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
ही घटना 8 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.30 ते 1.45 वाजेदरम्यान घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी कलम 303(2) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोहेका निलेश गाडगे यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बारिंगे, शेगाव शहर पोलीस ठाणे, करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)








