शेगाव | (डी ललित) : शेगाव शहरातील माळीपुरा परिसरात दारूच्या नशेत एका व्यक्तीने महिलेच्या घरात घुसून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर महिलेच्या पतीला रॉड दाखवत जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार शेगाव शहर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास माळीपुरा येथे घडली. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, शेजारी राहणारा आरोपी विश्वजित सारंगधर लांबे हा दारूच्या नशेत अंगावरील कपडे काढून केवळ चड्डीवर तिच्या घरात आला आणि तिला लज्जा वाटेल अशा अश्लील भाषेत शिवीगाळ केली. यामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरड केल्यानंतर शेजारील नागरिकांनी मध्यस्थी केली, त्यावेळी आरोपी तेथून निघून गेला.
काही वेळाने महिलेचे पती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाण्याची तयारी करत असताना आरोपी पुन्हा हातात लोखंडी रॉड घेऊन आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्याने पतीला जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेची आई आणि भाऊ यांनी मध्यस्थी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. आरोपीने कुटुंबातील सदस्यांना भविष्यात जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी महिलेच्या तोंडी तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७९, ३३३, ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन गावंडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)








