बुलढाणा,(युवा क्रांती वृत्तसेवा) दि. 1 जून (जिमाका) : जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी राज्यातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्प, निम्न वर्धा प्रकल्प, आर्वी उपसा सिंचन योजना आणि जिगांव प्रकल्पाचा क्षेत्रीय दौरा करून कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.
दौऱ्यादरम्यान त्यांनी वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या विविध बांधकाम स्थळांना भेट देऊन इंटेक स्ट्रक्चर, कालवा पूल, जलसेतू, सायफन, एस्केप, बोगदे आणि मार्गस्थ साठवण तलावांची पाहणी केली. प्रकल्पाच्या अंमलबजावणीत आवश्यक तांत्रिक सुधारणा तातडीने विचारात घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच वनजमिनीच्या मंजुरीसाठी वन विभाग आणि जलसंपदा विभाग यांच्यात प्रभावी समन्वय राखण्यावर भर देण्यात आला.
यावेळी बोलताना एकनाथ डवले यांनी वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्प हा विदर्भाच्या दीर्घकालीन जलव्यवस्थापनाचा कणा ठरणार असल्याचे सांगितले. सिंचन क्षमता वाढविणे, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील जिगांव धरण प्रकल्प आणि मनसगाव उपसा सिंचन योजना क्रमांक 7 च्या कामांचीही त्यांनी पाहणी केली. जिगांव प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पाणीसाठा निर्माण करण्याची सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच 11 हजार 350 हेक्टर क्षेत्रात दाबयुक्त नलिका वितरण प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत सिंचन सुविधा पोहोचविण्यासाठी उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्यावर भर दिला.
शेगाव येथे आयोजित बैठकीत जिगांव प्रकल्पाच्या भूसंपादन आणि पुनर्वसन कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्या उपस्थितीत प्रलंबित भूसंपादन प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्रधान सचिवांनी शेतकऱ्यांना वेळेवर, खात्रीशीर आणि शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगितले. यामुळे कृषी उत्पादनवाढीसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.







