शेगाव |(युवा क्रांती वृत्तसेवा) : 23 जुलै – संतनगरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव शहरातील खेतान चौक, गांधी चौक तसेच मंदिर परिसरातील काही गेस्ट हाऊसमध्ये कथित अनैतिक गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) शेगाव शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले. या प्रकारांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून शहराच्या धार्मिक व सामाजिक प्रतिमेलाही धक्का बसत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
मनसेच्या निवेदनानुसार, श्री गजानन महाराजांच्या पावन नगरीत काही ठिकाणी सुरू असल्याचा आरोप असलेल्या गैरप्रकारांमुळे महिला, विद्यार्थिनी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित परिसरातून वावरताना महिलांना असुरक्षित वाटत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, काही दिवसांपूर्वी एका स्थानिक महिलेला आपल्या लहान मुलांसह या परिसरातून जात असताना आवाज देऊन बोलावण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा घटनांमुळे महिलांच्या सन्मानासह त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाल्याने पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
हे निवेदन मनसेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. तालुकाध्यक्ष नितीश भावरकर आणि शहराध्यक्ष परमेश्वर लाहूडकर यांनी संबंधित गेस्ट हाऊसची सखोल चौकशी करून कथित गैरप्रकारांवर तातडीने आळा घालावा तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
निवेदन देताना वाहतूक सेना अध्यक्ष राम इंगळे, तालुका उपाध्यक्ष रोहित भांबरे, विद्यार्थी सेना अध्यक्ष सचिन नागे, विभाग प्रमुख धनंजय लोखंडे, ज्ञानेश्वर नंदाने, समाधान शेगोकार, किरण शेगोकार, सुनील वणारे, वैभव देशमुख, शुभम झाकर्डे, प्रफुल तायडे, गोपाल तायडे, दीपक ठाकरे, मंगेश काठोळे, विजू लांबे तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा👇🏻









