---Advertisement---

राठींचा राजीनामा, देशमुख अध्यक्षपदी; रौप्यमहोत्सवी गौरव सत्कार!

---Advertisement---

जळगांव जामोद (आकाश बोरसे) : परिसरातील अग्रगण्य व नावाजलेली श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक व माजी अध्यक्ष ओमप्रकाश राठी यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे अध्यक्षपदासह संचालक पदाचा राजीनामा दिला. संचालक मंडळाने हा राजीनामा सर्वानुमते मंजूर करून भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांची नवनियुक्त अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

राठी यांच्या दीर्घ २७ वर्षांच्या कार्यकाळात संस्थेने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा गौरव करण्यासाठी दिनांक २५ सप्टेंबर रोजी माधव सभागृहात रौप्यमहोत्सवी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी नव्या अध्यक्ष सचिन देशमुख होते, तर सत्कारमूर्ती म्हणून ओमप्रकाश राठी यांची विशेष उपस्थिती होती.

आपल्या मनोगतात राठी यांनी संस्थेच्या सुरुवातीपासून आजवरच्या प्रवासाचा आढावा घेतला. विपरीत परिस्थितीतही संस्थेला स्वतःची जागा व इमारत मिळवून दिली, स्वमालकीच्या ५ एकर शेतीवर धान्य गोदाम उभारले तसेच लवकरच नवे गोदाम उभारण्याचा निर्णय झाल्याची माहिती त्यांनी दिली. भागधारकांचा विश्वास मिळवून संस्था सहकार क्षेत्रात अग्रस्थानी पोहोचली, हे यश सामूहिक परिश्रमांचेच फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.

या वेळी नव्या अध्यक्ष सचिन देशमुख यांनी संचालक मंडळ कायम संस्थेच्या हिताचे निर्णय घेईल आणि संस्था उत्तरोत्तर प्रगतीपथावर राहील, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी राठी यांनी मार्गदर्शक म्हणून पुढेही साथ द्यावी, अशी विनंती केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक ज्ञानेश्वर उमाळे यांनी करत राठी यांच्या कार्यकाळातील कामगिरीला उजाळा दिला. आभारप्रदर्शन सहाय्यक व्यवस्थापक संजय दंडे यांनी केले. समारंभास सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते… (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment