संग्रामपूर (आकाश बोरसे) : अवैध रेतीउपसा आणि रेती वाहतुकीवर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून सलग दुसऱ्या दिवशी धडाकेबाज कारवाई करण्यात आली. संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 19) दोन वाहनांवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर आज बुधवारी पहाटेच नव्या कारवाईने रेती माफियांत खळबळ उडाली आहे.
पहाटेपासूनच विशेष पथकांनी विविध ठिकाणी सापळे रचून रेती वाहतुकीची तपासणी सुरू केली. या मोहिमेदरम्यान खिरोडा फाट्यानजीक अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर कारवाई करून ते जप्त करण्यात आले. संबंधित वाहनातील रेतीचे प्रमाण, परवाने व इतर कागदपत्रांची चौकशी सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.
तहसीलदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेने रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत. नियमबाह्यपणे रेती वाहतूक करणाऱ्यांवर कोणतीही गय न ठेवता कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या या सततच्या कारवाईचे स्वागत केले असून, अवैध रेतीउपसा पूर्णपणे थांबावा यासाठी अशाच मोहिमा नियमितपणे राबविण्याची मागणी केली आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे तालुक्यातील रेती चोरीवरील नियंत्रण वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)











