शेगाव, दि. 17 जून (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील टिपू सुलतान चौक परिसरात एका 65 वर्षीय महिलेला शिवीगाळ करून मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साजेदा बी पिता सुभान शाह (वय 65, रा. टिपू सुलतान चौक, शेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शेख जब्बार शेख बुडन व इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 189(2), 115(2), 352 व 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, 16 जून रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या नातवाने पोलीस ठाण्यात खोटा अहवाल दिल्याचा आरोप करत फिर्यादी व त्यांच्या भावाच्या मुलीला शिवीगाळ केली. यानंतर ढकलाढकली व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे फिर्यादीच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात आले असून, प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय गजानन गावंडे करीत आहेत.









