जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : जळगाव जामोद, संग्रामपूर आणि मलकापूर परिसरातील महावितरणच्या (MSEB) कथित विस्कळीत कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार ट्रान्सफॉर्मर जळणे, अपुरी वीजपुरवठा व्यवस्था आणि वाढत्या चोरीच्या घटनांमुळे बळीराजा संकटात सापडल्याचे पक्षाने म्हटले आहे.
जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी आवश्यक क्षमतेचे 100 केव्हीए ट्रान्सफॉर्मर बसविण्याऐवजी 63 केव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसविले जात असल्याने ओव्हरलोडिंग होऊन ते वारंवार जळत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक वीज मिळत नसून शेतीचे मोठे नुकसान होत आहे.
तसेच जामोद-सुनेगाव परिसरातील शेतकऱ्यांना शासनाच्या आश्वासनानुसार दिवसा किमान अर्धा वेळ वीजपुरवठा मिळणे अपेक्षित असताना तो होत नसल्याने शेतीचे नियोजन कोलमडल्याचा आरोप करण्यात आला.
यावेळी त्यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत मलकापूर सबडिव्हिजनमध्ये तब्बल 200 किलोमीटर वीज तारा चोरीला गेल्याचा दावा केला. शेतकऱ्यांच्या मोटारी व केबल चोरीच्या घटनाही वाढल्या असून हा प्रकार संघटित गुन्हेगारीचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले.
या सर्व चोरीप्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच आवश्यक असल्यास ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी प्रशासन व गृह विभागाकडे करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, शहराध्यक्ष ईरफान खान, एजाज देशमुख, आशिष वायझोडे, दत्ता डिवरे, सिद्धार्थ हेलोड़े यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.(युवा क्रांती वृत्तसेवा)










