संग्रामपूर (युवा क्रांती वृत्तसेवा) : संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल वसाली गावातील इको पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संगीतराव भोंगळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह केले.
१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जलाभिषेक करून पूजा व पुष्पार्पण करण्यात आले. यावेळी “शिवाजी महाराज की जय”, “जय शिवाजी जय भवानी”, “हर हर महादेव” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी बोलताना संगीतराव भोंगळ यांनी सांगितले की, पददलित, कष्टकरी व बहुजन समाजाला आपल्या अद्भुत नेतृत्वाने सक्षम करणारे शिवाजी महाराज यांचा धगधगता इतिहास अखंड भारतासाठी सदैव प्रेरणादायी आहे. आदिवासी भागात शिवरायांचे विचार पोहोचविण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास वनविभाग अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, पत्रकार, माजी सरपंच तसेच वन कर्मचारी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिवासी बांधवांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला.








