बुलढाणा | (युवा क्रांती वृत्तसेवा) : 3 ऑगस्ट- सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा आणि शासकीय कार्यालयांचे वारंवार हेलपाटे टाळावेत, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा’चा आराध्या लॉन्स येथे उत्साहात शुभारंभ झाला. या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या सेवा आणि योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निवारण करण्यात येत असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले.
उद्घाटन कार्यक्रमाला नगराध्यक्ष पूजा गायकवाड, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, तहसीलदार विठ्ठल कुंभरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार गायकवाड यांनी सांगितले की, या शिबिरामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचत असून विविध दाखले, प्रमाणपत्रे तसेच शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळत आहे. शासनाच्या सेवा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
शहर व परिसर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हक्काची घरे देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी पांदण रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यात येत असून त्यामुळे शेतीमालाच्या वाहतुकीला मोठी गती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

संभाव्य हवामान बदल आणि अल-निनोच्या पार्श्वभूमीवर जलनियोजनाचे महत्त्व अधोरेखित करत अटल भूजल योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वैनगंगा नदीचे पाणी नळगंगा प्रकल्पात आणून जिल्ह्यातील अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 2.27 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे सांगून पात्र शेतकऱ्यांनी AgriStack वर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध योजनांतील लाभार्थ्यांना साहित्य, धनादेश आणि लाभ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. शिबिरामुळे नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या दैनंदिन समस्यांचे तत्काळ निराकरण होत असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.









