संग्रामपूर(आकाश बोडसे): तालुक्यातील सोनाळा ग्रामपंचायतीतील रिक्त पदे तातडीने भरावीत तसेच प्रलंबित मागण्यांवर निर्णय घ्यावा या मागण्यांसाठी पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी आज दि. ४ मार्चपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेविरोधात हे आंदोलन छेडण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांनी यापूर्वी दि. १६ जुलै २०२५ रोजी संग्रामपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केले होते. त्यानंतर अनेक वेळा पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोनाळा ग्रामपंचायतीमध्ये वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिक यांसारखी महत्त्वाची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांना दाखले, प्रमाणपत्रे व इतर शासकीय सेवांसाठी विलंब सहन करावा लागत आहे.
२५ ते ३० वर्षांपासून सेवेत असलेल्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना संबंधित रिक्त पदांवर संधी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेत आवश्यक ती जाहिरात किंवा दवंडी न काढता पारदर्शकता पाळली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी प्रशासनाकडे केली आहे.
या आमरण उपोषणात राजेश उमाळे, गोविंदा देशमुख, देवासिंग कचवार, शेख आशिक, शंकर कांडेलकर व शरद लव्हाळे यांचा सहभाग असून प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.(युवा क्रांती वृत्तपत्र)








