शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरातील मधुवन पॅलेस गेस्टहाऊसमध्ये एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार, दि. 17 एप्रिल 2026 रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, प्रितम राजेंद्र कुलकर्णी (रा. राजकमल हाउसिंग सोसायटी, कामरवाडा रोड, नाशिक) असे मृत युवकाचे नाव आहे. तो आपल्या सोबत नितीन गोरख सावळे याच्यासह शेगांव येथील मधुवन पॅलेस गेस्टहाऊसमध्ये आला होता.
घटनेच्या दिवशी दुपारी 2 ते 2.45 वाजण्याच्या सुमारास लॉजमधील रूम क्रमांक 103 मधून आरडाओरड ऐकू आल्याने संबंधितांनी तक्रारदार कमलेश कैलाश शर्मा यांना माहिती दिली. ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता, एक युवक कॉटवर पडून ओरडत होता, तर दुसरा युवक बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.चौकशीदरम्यान नितीन सावळे याने बेशुद्ध पडलेला युवक प्रितम कुलकर्णी असून त्याने गळफास घेतल्याची माहिती दिली. यानंतर तत्काळ पोलिसांना कळविण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी शेगांव शहर पोलीस ठाण्यात कलम 194 BNSS अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन गावंडे करीत आहेत.







