---Advertisement---

ZRUCC बैठकीत पश्चिम विदर्भाच्या रेल्वे प्रश्नांवर भर; श्यामभाऊ आकोटकार यांची प्रभावी मांडणी!!

---Advertisement---

मुंबई (आकाश बोरसे): दि 24 एप्रिल-मध्य रेल्वेच्या अत्यंत महत्त्वाच्या *झोनल रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी (ZRUCC)*ची १२७ वी बैठक मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत समितीचे नवनियुक्त सदस्य श्यामभाऊ आकोटकार यांनी पश्चिम विदर्भातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि समस्यांचा ठामपणे पाठपुरावा करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव तसेच राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ. संजयभाऊ कुटे यांच्या शिफारशीनुसार आकोटकार यांची या प्रतिष्ठित समितीवर निवड करण्यात आली आहे. नियुक्तीनंतरच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी सक्रिय भूमिका बजावत आपली छाप उमटवली.

या बैठकीला अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप धोत्रे, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक (GM) राजीव श्रीवास्तव, उपमहाप्रबंधक तसेच विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पश्चिम विदर्भातील रेल्वे मार्गांचे आधुनिकीकरण, नवीन गाड्यांना थांबा देणे, प्रवासी सुविधांमध्ये वाढ करणे तसेच प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देणे यांसारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत बोलताना आकोटकार म्हणाले की, पक्ष व मार्गदर्शकांनी दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत रेल्वे प्रवाशांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. अकोला–खंडवा मार्गासह स्थानिक स्थानकांवरील सुविधा सुधारण्यासाठी वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या नियुक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी ना. प्रतापराव जाधव आणि डॉ. संजयभाऊ कुटे यांचे आभार मानले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम विदर्भाला रेल्वे सुविधांमध्ये न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, आकोटकार यांच्या पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रशासनाने अनेक मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असून, त्यांच्या कार्याचे राजकीय व सामाजिक स्तरावरून कौतुक होत आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment