शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) – शहरातील वाटीका चौक परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला जातिवाचक शिवीगाळ करून धमकावल्याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 15 एप्रिल रोजी दुपारी साडेएक वाजताच्या सुमारास घडली असून, 24 एप्रिल रोजी याबाबत तक्रार नोंदविण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश लक्ष्मण तायडे (वय 65, रा. शेगाव) हे आपल्या मित्राच्या बोलावण्यावरून वाटीका चौकातील अपना फर्निचर दुकानाजवळ गेले होते. त्यावेळी त्यांच्या मित्राच्या कौटुंबिक वादासंदर्भात चर्चा सुरू असताना, फिर्यादी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, आरोपी सोहेल अली एजाज अली (वय 35, रा. खामगाव) याने फिर्यादी यांना उद्देशून जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करत अपमानित केले. तसेच त्यांना धमकी देत “तुम्हाला पाहून घेईन” असेही म्हटल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादी हे अनुसूचित जातीतील असल्याची माहिती असूनही आरोपीने सार्वजनिक ठिकाणी त्यांचा अपमान केल्याने त्यांना मानसिक धक्का बसल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 296, 351(2) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम 3(1)(r), 3(2)(va) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील करीत असून, पोलीस निरीक्षक निमीष मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.








