बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. २५ एप्रिल – अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील महसूल व विविध विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार उपस्थित होते.
बैठकीदरम्यान वाळू घाटांची सद्यस्थिती, अवैध उत्खननावर नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच अवैध बांधकामे व अतिक्रमण हटविण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

जिल्ह्यातील रस्ते विकास, पाणीपुरवठा, जलसंवर्धन तसेच शेतजमिनींच्या मोजणीतील अडचणी दूर करण्यावर विशेष भर देण्यात आला. नागरिकांना सेवा देताना ऑनलाईन प्रणालींचा अधिक प्रभावी वापर करावा, असे मार्गदर्शनही खारगे यांनी अधिकाऱ्यांना केले.
गावपातळीवरील समस्या तातडीने सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश देण्यात आले. यासोबतच बंद पडलेल्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावरही भर देण्यात आला.
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करून प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करण्याचे आवाहन करण्यात आले. सर्व कामे पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.










