बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि.25 एप्रिल-बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वारी हनुमान ते सलवान दरम्यान प्रस्तावित रामसेतू केबल-स्टेड एफओबी पादचारी पुलाला अखेर वन विभागाची मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला आहे.
या भागातील नागरिकांनी वारी हनुमान ते सलवान दरम्यान पादचारी पुलाची दीर्घकाळापासून मागणी केली होती. मात्र हा परिसर मेळघाट व्याघ्र प्रकल्प च्या बफर झोनमध्ये येत असल्यामुळे वन्यजीव विभागाची परवानगी आवश्यक होती.
राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या संदर्भात वन मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्यानंतर वन विभागाने अखेर या पुलासाठी मंजुरी दिली आहे. हा पूल मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील वारी हनुमान येथे उभारण्यात येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकल्पासाठी डिझाईन तयार करून निविदा प्रक्रिया देखील सुरू केली आहे. सुमारे 746.40 लाख रुपयांचा हा प्रकल्प असून पुलाची उंची पायापासून सुमारे 45.80 मीटर असणार आहे. हा पूल केबल-स्टेड एफओबी स्वरूपात उभारण्यात येणार आहे.
हा पूल पूर्ण झाल्यानंतर वारी ते सलवान दरम्यान पादचाऱ्यांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार असून स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे.









