बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : २५ एप्रिल-बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तहसील प्रशासनाने ‘रस्ते मोकळे’ मोहिमेला वेग देत एका दिवसात तीन प्रलंबित शेतरस्ते मोकळे करून तिहेरी यश संपादन केले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मौजा महीमळ येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सुमारे 0.5 कि.मी. लांबीचा शेतरस्ता तहसीलदार विजय सावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खुला करण्यात आला. या कामात नायब तहसीलदार, ग्राम महसूल अधिकारी रजनी देशमुख, सरपंच पार्वताबाई खंबाईतकर, पोलीस पाटील व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. या रस्त्यामुळे सुमारे 60 ते 70 नागरिकांचा प्रवास सुलभ झाला.
तसेच मौजा करतवाडी येथे करतवाडी ते अशोक सपकाळ यांच्या शेतापर्यंतचा अंदाजे 1 कि.मी. रस्ता मोकळा करण्यात आला. या उपक्रमात भूमी अभिलेख कार्यालयातील खेडकर, ग्राम महसूल अधिकारी रजनी देशमुख व स्थानिक नागरिकांचा सहभाग होता. या रस्त्याचा थेट लाभ सुमारे 225 नागरिकांना झाला.

याशिवाय मौजे बाभूळगाव, सावरखेड व बुद्रुक येथे अंदाजे 2.50 कि.मी. लांबीचा शिवरस्ता मोकळा करण्यात आला. या कामात भूमी अभिलेख विभागातील खेडकर यांनी अचूक मोजणी करून आखणी केली. ग्राम महसूल अधिकारी अर्चना बाहेकर, रजनी देशमुख, मोरे साहेब व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सर्व अडचणी जागेवरच निकाली काढण्यात आल्या. या रस्त्यामुळे सुमारे 100 ते 120 नागरिकांना दिलासा मिळाला.
या सलग आणि प्रभावी कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागले असून ग्रामीण दळणवळणाला नवी गती मिळाली आहे. प्रशासनाच्या या कार्यक्षमतेचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.










