देऊळगाव(युवा क्रांती वृत्तसेवा): राजा तालुक्यातील पांगरीवाडी येथील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पांगरीवाडी पाटाला अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.
गावकऱ्यांनी शेतीसाठी सिंचनाची सुविधा व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, अशी मागणी केली होती. तांत्रिक अडचणींमुळे कालव्यातून पाणी देणे शक्य नसल्याने जलाशयातून उपसा पद्धतीने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता.
या संदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. 20 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. आता या पाटाच्या कामाला अधिकृत मंजुरी मिळाली असून VIDC नागपूरला सर्वेक्षण व काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे पांगरीवाडी व परिसरातील शेती सिंचनाखाली येणार असून पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.









