शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा): शहरात आर्थिक फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, शेगांव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 286/2026 अंतर्गत 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबक तोताराम घोगले (वय 93 वर्ष) यांनी श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था शेगाव येथे विश्वास ठेवून 3,00,000 रुपये मुदत ठेव (FD) स्वरूपात जमा केले होते. संबंधित आरोपींनी अधिक व्याज देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, मुदत संपल्यानंतर फिर्यादी यांनी पैसे परत मागितले असता आरोपींनी टाळाटाळ करत रक्कम देण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच, “तुम्हाला कोणतीही रक्कम मिळणार नाही, आमचे काहीही बिघडणार नाही” असे धमकीचे शब्दही वापरल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात रामभाऊ नामदेवराव गोटे व इतर पदाधिकारी व संचालकांसह एकूण 10 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 61(2), 316(2), 318(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकार हा 12 फेब्रुवारी 2024 ते 16 जानेवारी 2026 या कालावधीत घडल्याचे नमूद असून, 05 मे 2026 रोजी दुपारी 2:10 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास PSI संदीप बारिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.







