शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगांव शहरातील जीवन ज्योती हॉस्पिटलजवळील परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा तब्बल ४ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी सुरज राधेश्याम सराफ (वय ५२, व्यवसाय खासगी नोकरी, रा. जीवन ज्योती हॉस्पिटलजवळ, शेगाव) यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी कुटुंबासह नागपूर येथे गेले होते. त्यांनी ६ मे रोजी पहाटे घराला कुलूप लावून प्रवास केला होता. लग्न समारंभ आटोपल्यानंतर ८ मे रोजी सकाळी ते शेगाव येथे परतले असता घराच्या दरवाजावरील कुलूप तुटलेले दिसले.
घरात प्रवेश करून पाहणी केली असता सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तसेच कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. चोरी झालेल्या ऐवजात सोन्याची चैन, मंगळसूत्र, अंगठ्या, कानातील दागिने, पेंडल, चांदीचे पैंजण, बिछुडे, चांदीची चैन, चांदीची नाणी तसेच १ लाख ५० हजार रुपयांची रोकड असा एकूण ४ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
ही चोरी ६ मे ते ८ मे दरम्यान घडल्याचा अंदाज असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.








