शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील एसबीआय बँकेसमोर उभी असलेल्या स्कुटीची डिक्की फोडून त्यामधील ३५ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मोहम्मद शरीफ मोहम्मद याकूब (वय ४७, व्यवसाय प्लॉट खरेदी-विक्री, रा. फरशी जामा मस्जिदजवळ, शेगाव) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी प्लॉट व्यवहारातून मिळालेल्या रकमेपैकी ३५ हजार रुपये आपल्या ॲक्सेस स्कुटीच्या डिक्कीत ठेवले होते. त्यानंतर ते नमाज पठणासाठी गेले होते. दरम्यान त्यांचा मित्र एसबीआय बँकेत पैसे काढण्यासाठी थांबला होता.
नमाज पठण करून परत आल्यानंतर दोघेही स्कुटीकडे गेले असता स्कुटीची डिक्की उघडी दिसून आली. त्यामध्ये ठेवलेली ३५ हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेतला असता कोणतीही माहिती मिळाली नाही.
ही घटना ७ मे २०२६ रोजी दुपारी २.१५ ते २.४५ वाजेदरम्यान एसबीआय बँक, मेन रोड, शेगाव येथे घडली. अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०३(२) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका संतोष गवई करीत आहेत.










