बुलढाणा (जि.मा.का.)(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि 14 मे-बुलढाणा जिल्ह्यात शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरूअसून, मॉडेल डिग्री कॉलेज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयामुळे जिल्ह्याचा कायापालट होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संचालित बिरसिंगपूर येथील मॉडेल डिग्री कॉलेजच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात प्रतापराव जाधव म्हणाले की, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महाविद्यालयाच्या इमारतीच्या कामाला सुरुवात होत आहे. या महाविद्यालयामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जिल्ह्यातच उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहेत.
महाविद्यालयात सुसज्ज इमारतीसोबतच स्विमिंग पूल, क्रीडांगण यांसारख्या आधुनिक सुविधा उभारल्या जाणार असून, यामुळे गुणवंत विद्यार्थी घडण्यास मदत होईल आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढेल, असेही त्यांनी सांगितले. तसेच, सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

विद्यार्थ्यांना मिळणार जिल्ह्यातच गुणवत्तापूर्ण शिक्षण
यावेळी संजय गायकवाड यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागत होते. मात्र आता मॉडेल डिग्री कॉलेजमुळे जिल्ह्यातच गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे. महाविद्यालयाचे बांधकाम उच्च दर्जाचे व्हावे, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, वित्त व लेखा अधिकारी सीए पुष्कर देशपांडे, प्राचार्य डॉ. नागरे, मानद संचालक डॉ. ए.आर. म्हळसने, कार्यकारी अभियंता जे.एन. काळे, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तसेच बिरसिंगपूरच्या सरपंच वैशाली शिंदे आदी उपस्थित होते.










