बुलढाणा | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शासनाच्या महत्वाकांक्षी डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) अंतर्गत उन्हाळी हंगाम 2026 साठी सुरू असलेल्या ई-पीक पाहणी मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंदणी 24 मे 2026 पूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.
उन्हाळी हंगाम 2026 ई-पीक पाहणी मोहिमेला 8 एप्रिल 2026 पासून सुरुवात झाली असून बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 47 हजार 894.37 हेक्टर क्षेत्रावर नोंदणी पूर्ण झाली आहे. तसेच एकूण 7 लाख 99 हजार 195 पीक पाहणी करावयाच्या मालक प्लॉटपैकी 37 हजार 45 प्लॉटवर शेतकऱ्यांनी DCS व्हर्जन 4.0.6 मोबाईल अॅपद्वारे नोंदणी केली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ई-पीक पाहणीसाठी अँड्रॉईड मोबाईल आवश्यक असून गुगल क्रोम अपडेट करून ई-पीक पाहणी व्हर्जन 4.0.6 अॅप इन्स्टॉल करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेत बांधावर जाऊन पिकांची माहिती अॅपमध्ये भरून अपलोड करावी.
मोबाईल उपलब्ध नसल्यास किंवा अॅप वापरण्यात अडचण असल्यास संबंधित गावातील तलाठी, कोतवाल, कॉमन सर्व्हिस सेंटर तसेच नियुक्त सहाय्यकांची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत 100 टक्के ई-पीक पाहणी नोंदणी बंधनकारक असून उभे पीक, कायम पड किंवा चालू पड जमिनींची माहिती नोंदविणे आवश्यक आहे. शेतकरी स्तरावर नोंदणी न झालेल्या जमिनींची नोंद सहाय्यक स्तरावरून पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ई-पीक पाहणी नोंदणी न केल्यास सातबारावर पीक पेरा कोरा राहणार असून त्यानंतर नोंद करता येणार नाही. त्यामुळे पीक विमा, शासकीय अनुदान तसेच नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई मिळविताना अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी 24 मे पूर्वी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.








