---Advertisement---

शेतकऱ्यांना कॅनमधून डिझेल द्या, पेट्रोल-डिझेल दर कमी करा; शिवसेना ठाकरे गटाचे निवेदन!!

---Advertisement---

संग्रामपूर (आकाश बोरसे) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संग्रामपूर तालुका पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनामध्ये शेतकऱ्यांना कॅनमधून डिझेल देण्याची परवानगी, पेट्रोल-डिझेल दर कमी करणे, तसेच NEET 2026 पेपरफुटी प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर अत्यावश्यक असून ट्रॅक्टरसाठी लागणारे डिझेल शेतकऱ्यांना कॅनमधून उपलब्ध करून द्यावे. प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पेट्रोल पंपावर आणणे शक्य नसते. शेतीच्या कामादरम्यान डिझेल संपल्यास ट्रॅक्टर पंपापर्यंत नेणे मोठी अडचण ठरते. त्यामुळे ट्रॅक्टरची आरसी पाहून शेतकऱ्यांना कॅनमधून डिझेल देण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासनाने तातडीने इंधन दर कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

याशिवाय NEET 2026 पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच लाखो विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, दुसऱ्या निवेदनाद्वारे तालुका कृषी अधिकारी संग्रामपूर यांच्यामार्फत केळी पिकाचे अनुदान, मजुरांच्या मस्टरचे पैसे तसेच केळी रोपांचे अनुदान तातडीने वितरित करण्याची मागणी करण्यात आली. मागील वर्षापासून अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच ट्रॅक्टर, ट्रॉली, रोटावेटर, पंजी, कल्टीवेटर आदी यांत्रिकीकरण योजनांचे प्रलंबित अनुदान तातडीने वितरित करावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

मागण्यांकडे गंभीरपणे लक्ष न दिल्यास “शिवसेना स्टाइल” आंदोलन व उपोषण छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment