बुलढाणा | (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि.९ जून २०२६ – बुलढाणा तालुक्यातील साखळी बुद्रुक येथील अवघ्या दहा वर्षीय सिद्धी सोनवणे हिच्या धाडसी कार्याचा गौरव केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि राज्याचे गृह, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आला. मेहकर पंचायत समितीच्या उद्घाटन कार्यक्रमात हा सत्कार सोहळा पार पडला.
सिद्धी ही विठ्ठल ज्ञानदेव सोनवणे यांची कन्या असून तिने अवघ्या सातव्या वर्षी कळसुबाई शिखर सर करत आपल्या धाडसी प्रवासाची सुरुवात केली. त्यानंतर तिने केदारकंठा, कोकणकडा तसेच माउंट एवरेस्ट बेस कॅम्पपर्यंत यशस्वी मोहीम पूर्ण केली आहे.
प्रत्येक शिखरावर पोहोचल्यानंतर सिद्धीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा ध्वज आणि राष्ट्रध्वज तिरंगा फडकवत राष्ट्रगीताद्वारे मानवंदना दिली. तिच्या या पराक्रमामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.
कार्यक्रमादरम्यान सिद्धीने मंत्र्यांकडे मनोगत व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्या आत्मविश्वासाचे कौतुक करत दोन्ही मंत्र्यांनी तिला माईक देऊन व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली. यावेळी सिद्धीने आपल्या साहसी मोहिमांचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला. तिचे अनुभव ऐकून उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात तिचे कौतुक केले.
सिद्धीने आतापर्यंत दोन राज्यस्तरीय स्पर्धांसह तब्बल 25 मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला आहे. तिच्या साहसी प्रवासासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या माध्यमातून वेळोवेळी मदतीचा हात देण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.









