जळगाव जामोद (युवा क्रांती वृत्तसेवा) : सौ. अपर्णाताई संजय कुटे यांची ‘विश्वमांगल्य विदर्भ प्रांत अध्यक्ष’ पदावर निवड झाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, नुकताच त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष बाळूभाऊ बोराडे, युवा क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष विजय यादव, समाजसेवक प्रवीण मोरखडे, अमर खराडे तसेच श्याम पाटणे यांनी उपस्थित राहून अपर्णाताई कुटे यांचा सन्मान केला. सर्व मान्यवरांनी त्यांच्या भावी सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सौ. अपर्णाताई कुटे या माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासातील खंबीर साथीदार म्हणून ओळखल्या जातात. सामाजिक बांधिलकी, जनसंपर्क आणि सर्वसामान्यांप्रती असलेली आपुलकी यामुळे त्यांनी नागरिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
मतदारसंघातील प्रत्येक सुख-दुःखात सहभागी होत नागरिकांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे माया व आधार देण्याची त्यांची कार्यपद्धती सर्वश्रुत आहे. महिलांच्या प्रश्नांपासून सामाजिक उपक्रमांपर्यंत त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला असून, त्यांच्या कार्याची दखल घेत ‘विश्वमांगल्य विदर्भ प्रांत अध्यक्ष’ पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
या निवडीमुळे कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.










