बुलढाणा,(युवा क्रांती वृत्तसेवा) दि. २६ जून (जिमाका): आषाढी वारी महायात्रा-२०२६च्या पार्श्वभूमीवर विविध संतांच्या पालखी सोहळ्यांचे नियोजन, वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे तसेच चोख बंदोबस्त ठेवण्याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीतील निर्देशांनुसार विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. आषाढी वारी कालावधीत राज्यासह इतर राज्यांतून मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होणार असल्याने त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी आरोग्य सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वाहतूक व्यवस्था आणि गर्दी व्यवस्थापनावर विशेष भर देण्यास सांगण्यात आले आहे.
पालखी मार्गावरील जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने आवश्यक नियोजन करावे, वाहतूक व्यवस्थापन, आपत्कालीन सेवा, वैद्यकीय पथके, अग्निशमन यंत्रणा तसेच नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विविध विभागांनी समन्वयाने काम करून वारकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
आषाढी वारी महायात्रा शांततापूर्ण, सुरक्षित आणि सुरळीत पार पडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सज्ज राहून आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाने केले आहे.









