संग्रामपूर | (आकाश बोरसे) : २९ जून – आजाद समाज पार्टी (कांशीराम)चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ॲड. चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनीष साठे यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते सुजित बांगर यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्यावर पक्षाच्या संघटनात्मक जबाबदारीची धुरा सोपविण्यात आली.
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. सुजित बांगर यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्य करत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक, शोषित, वंचित, पीडित, शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी आणि युवकांच्या विविध जनहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे राज्यभर पक्षाच्या संघटन विस्ताराला नवी गती मिळेल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला.
प्रदेश सचिव पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुजित बांगर यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी त्यांनी, “पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, सर्व समाजघटकांतील नागरिक आणि युवकांना संघटनेशी सन्मानपूर्वक जोडणे तसेच सामाजिक न्यायाच्या लढ्याला अधिक बळ देण्यासाठी कटिबद्ध राहणार,” अशी भावना व्यक्त केली.
सुजित बांगर यांच्या निवडीचे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)










