शेगाव | (युवा क्रांती वृतसेवा) : शेगाव शहरातील व्यंकटेश नगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान चाकू हल्ल्यात झाल्याची घटना गुरुवार, दि. २ जुलै रोजी दुपारी घडली. या घटनेत एक तरुण व त्याचा मित्र जखमी झाले असून, या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी श्रीनित किशोर डाबेराव (वय २०, रा. व्यंकटेश नगर, शेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वृषी भटकर, तुषार सोळंके, प्रफुल केनेकर आणि प्रशांत धुळे (सर्व रा. व्यंकटेश नगर, शेगाव) यांच्याविरुद्ध कायम अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३५२, ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, दि. २ जुलै रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आपल्या आई-वडील, भाऊ व मित्र रोशन यांच्यासह घरी उपस्थित असताना आरोपी घरासमोर येऊन शिवीगाळ करू लागले. फिर्यादीने शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता आरोपी प्रशांत धुळे याने जवळील चाकूने फिर्यादीच्या हातावर तसेच पोटावर वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला असून त्याच्या हात व पोटातून रक्तस्त्राव झाला.
यावेळी फिर्यादीचा मित्र रोशन यालाही आरोपीने चाकूने डाव्या हातावर वार करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच इतर आरोपींनी फिर्यादीच्या आई-वडील व भावाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची नोंद महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल चारूशिला गवई यांनी केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील सुसर करीत आहेत.
पोलीस या घटनेमागील नेमके कारण तसेच आरोपींच्या भूमिकेचा अधिक तपास करीत आहेत.









