---Advertisement---

रेल्वे स्टेशन शेगाव येथील मोबाईल चोरीचा गुन्हा उघड; सराईत चोरटा अटकेत!

---Advertisement---

शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) दि. ३ जुलै : रेल्वे स्टेशन शेगाव येथील बुकिंग कार्यालय परिसरात प्रवाशाचा मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला लोहमार्ग पोलीस ठाणे शेगावच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत अटक केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ६ जून २०२६ रोजी एका प्रवाशाने रेल्वे स्टेशन शेगाव येथील बुकिंग कार्यालय परिसरात आपला मोबाईल चार्जिंगसाठी लावून ठेवला होता. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने मोबाईल लंपास केला. या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाणे शेगाव येथे गुन्हा रजिस्टर कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करण्यात आली. त्यामध्ये एक संशयित व्यक्ती मोबाईल चोरी करताना स्पष्ट दिसून आली. तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची ओळख शेख राजिक शेख युसूफ (रा. घारोड, ता. खामगाव, जि. बुलढाणा) अशी पटली.

आरोपीचा शोध सुरू असताना १ जुलै रोजी तो घारोड येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घारोड येथे रवाना झाले. हिवरखेड पोलिसांच्या सहकार्याने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

प्राथमिक चौकशीत आरोपी हा सराईत चोरटा असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या इतर गुन्ह्यांतील सहभागाबाबत अधिक तपास सुरू असून चोरीस गेलेला मोबाईल व इतर मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई लोहमार्ग पोलीस ठाणे शेगावचे प्रभारी अधिकारी विवेकानंद राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भास्कर दामोदर, किरण आघाव आणि पोलीस अंमलदार बबन शिरसाठ यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment