शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या काळी-पिवळी प्रवासी वाहनांमधून अज्ञात चोरट्याने तीन बॅटऱ्या चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इमरान खान खाजा खान (वय 38, व्यवसाय- चालक, रा. बाजार फैल, शेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही घटना 3 जुलै 2026 रोजी रात्री 8.00 ते 4 जुलै 2026 रोजी पहाटे 4.30 या कालावधीत शेगाव बसस्थानकाजवळ घडली. फिर्यादी, त्यांचा भाऊ आणि मित्र यांनी त्यांच्या काळी-पिवळी प्रवासी गाड्या बसस्थानक परिसरात उभ्या करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गाड्या सुरू करण्यासाठी आले असता वाहनांतील बॅटऱ्या चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये POWER कंपनीची एक जुनी बॅटरी, PHILIPS कंपनीची एक जुनी बॅटरी आणि AMARON कंपनीची एक जुनी बॅटरी अशा एकूण 13,500 रुपयांच्या बॅटऱ्यांचा समावेश आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष गवई करीत असून अधिक तपास सुरू आहे.








