शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव शहरातील आठवडी बाजार परिसरातील राजधनी साडी शोरूम समोरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन सदर ठिकाण ‘नो पार्किंग झोन’ घोषित करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी 11 जुलै रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदनाद्वारे केली.
मनसे जिल्हाध्यक्ष अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या मार्गावर जीवनज्योती हॉस्पिटल, भुतडा हॉस्पिटल, बनोले क्लिनिक आणि इंगळे हॉस्पिटल असल्याने रुग्णवाहिका व अत्यावश्यक वाहनांची सतत ये-जा सुरू असते. मात्र, शोरूमसमोर अनधिकृतपणे उभी केली जाणारी वाहने वाहतुकीस अडथळा ठरत आहेत.
मनसेच्या म्हणण्यानुसार, शोरूमच्या मागील बाजूस पार्किंगची व्यवस्था असूनही अनेक ग्राहक मुख्य रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते. याचा फटका रुग्ण, नागरिक आणि आपत्कालीन सेवांना बसत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
याशिवाय परिसरात अनेक शाळा व महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शोरूमसमोरील रस्ता ‘नो पार्किंग झोन’ घोषित करावा, “नो पार्किंग” फलक लावावेत, वाहने मागील पार्किंगमध्येच उभी करण्याची सक्ती करावी आणि नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष नितीश भावरकर, शहराध्यक्ष परमेश्वर लहुडकर, वाहतूक सेना शहराध्यक्ष राम इंगळे यांच्यासह विभाग प्रमुख धनंजय लोखंडे, ज्ञानेश्वर नंदाने, समाधान शेगोकर, किरण शेगोकर, शिवाचरण पारसकर, कडू धोटेकर, वैभव देशमुख, सागर लांजुळकर तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









