शेगाव | (डी ललित) : शेतीसाठी खत खरेदी करण्यासाठी शेगावात आलेल्या एका शेतकऱ्याची हॉटेलसमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना श्री टॉकीज चौक परिसरात घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रताप नारायण वावरे (वय 40, रा. लोहारा, ता. बाळापूर, जि. बुलढाणा) यांनी 12 जुलै 2026 रोजी पहाटे शेगाव येथे खत खरेदीसाठी येऊन श्री टॉकीज चौकातील हैदराबादी बिर्याणी हॉटेलसमोर आपली एच.एफ. डिलक्स (MH-30 BG-6067) दुचाकी उभी केली. बिर्याणी खाऊन बाहेर आल्यानंतर दुचाकी जागेवर दिसून आली नाही.
परिसरात शोध घेऊनही वाहनाचा मागमूस न लागल्याने त्यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चोरीस गेलेल्या लाल-काळ्या रंगाच्या एच.एफ. डिलक्स दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 303(2) नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघमारे करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)








