शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. १७ जुलै –शेगाव तालुक्यातील चिंचोली, टाकळी विरो, टाकळी हाट व परिसरातील शेकडो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी शेगाव येथे ये-जा करतात. मात्र, या मार्गावरील परतीची एसटी बस सायंकाळी उशिरा असल्याने विद्यार्थ्यांना अंधारात प्रवास करावा लागत असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद-बजरंग दल, शेगाव यांच्या वतीने शेगाव आगार प्रमुखांना बसफेरीची वेळ बदलण्याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या या मार्गावरील बस सायंकाळी सुमारे ७ वाजता सुटत असल्याने विद्यार्थी, विशेषतः अल्पवयीन विद्यार्थिनींना अंधार झाल्यानंतर प्रवास करावा लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे बसफेरीची वेळ बदलून सायंकाळी ५.३० ते ६.०० वाजेदरम्यान बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या गैरसोयीचा व सुरक्षिततेचा विचार करून परिवहन महामंडळाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
या वेळी धनश्री भिकाजी चव्हाण (चिंचोली), प्रणाली गजानन काळे (चिंचोली), वैष्णवी रामेश्वर काळे (टाकळी विरो), खुशी गणेश तायडे (टाकळी विरो), भक्ती पुरुषोत्तम फाडके (टाकळी विरो), समर्थ प्रमोद बहुरकार, गणेश आनंदा बढे यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
निवेदनावर विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री सोमेश प्र. कांबळे, प्रखंड उपाध्यक्ष सुनील जवंजाळ, प्रखंड विद्यार्थी प्रमुख विशाल वाघ आणि बजरंग दल सहसंयोजक सागर होनाळे यांच्या स्वाक्षऱ्या असून, शेगाव आगार प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.









