संग्रामपूर | (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि .१८ जुलै-संग्रामपूर तालुक्यातील निवाणासह अनेक गावांमध्ये निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवले आहे. तीन ते चार एकरांवर सोयाबीनची पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात उगवण अत्यंत कमी झाल्याने अखेर पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की, पेरणीनंतर दहा ते बारा दिवस प्रतीक्षा करूनही केवळ २० टक्केच उगवण झाली, तर सुमारे ८० टक्के बियाणे निष्फळ ठरले. त्यामुळे संपूर्ण पिकाची नासाडी झाली असून आता दुबार पेरणीशिवाय पर्याय उरलेला नाही. मात्र गेल्या आठवडाभरापासून पावसानेही दडी मारल्याने दुसरी पेरणी कधी करायची, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी रवी कंपनीच्या (उन्नती) सोयाबीन बियाण्याची पेरणी केली होती. या बियाण्याची उगवण अपेक्षित न झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला प्रति एकर ₹५० हजार नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
शेतकऱ्यांच्या मते, आधीच अवकाळी पाऊस, हवामानातील अनिश्चितता आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यात निकृष्ट बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीने त्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे. “हा केवळ निसर्गाचा नव्हे, तर शेतकऱ्यांच्या विश्वासाचा घात आहे,” अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, काही शेतकऱ्यांनी उगवण न झाल्यानंतर तातडीने दुबार पेरणी केली. त्यानंतर त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली असता, “दुबार पेरणी करण्यापूर्वी तक्रार दिली असती तर पंचनामा करता आला असता. आता मदत करणे शक्य नाही,” असे उत्तर मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
मात्र, अनेक शेतकऱ्यांनी पहिल्या व दुसऱ्या बियाण्यांच्या खरेदीची बिले जतन करून ठेवली असून, दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वीकारून त्यांनाही नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
कृषी अधिकारी नसल्याने अडचणी वाढल्या
संग्रामपूर तालुक्यात गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून तालुका कृषी अधिकारी पद रिक्त असल्याचा मुद्दाही यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पदाचा अतिरिक्त कार्यभार जळगाव जामोद येथील कृषी अधिकारी यांच्याकडे असल्याने ते आठवड्यातून केवळ एक-दोन दिवस संग्रामपूर कार्यालयात येतात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
यामुळे इतर अधिकारीही नियमित उपलब्ध नसतात आणि शेतकऱ्यांना साध्या कामांसाठी अनेक वेळा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे संग्रामपूर तालुक्यासाठी तातडीने कायमस्वरूपी कृषी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांसह शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :
- संबंधित बियाणे कंपनीवर तातडीने कारवाई करावी.
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर ₹५० हजार नुकसानभरपाई द्यावी.
- दुबार पेरणीसाठी मोफत किंवा अनुदानित बियाणे उपलब्ध करून द्यावे.
- दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्याही तक्रारी स्वीकारून मदत द्यावी.
- संग्रामपूर तालुक्यात कायमस्वरूपी कृषी अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करावी.










