शेगाव (डी ललित) : दि. 19 जुलै- शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या सोयाबीन बियाण्याच्या उगवण क्षमतेबाबतच्या तक्रारीनंतर जालना जिल्ह्यातील एका बियाणे उत्पादक कंपनीविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करून फसवणूक केल्याचा आरोप कंपनीवर ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, शेगाव येथील कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) जानू रंगलाल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रा. लि., गेवराई बाजार, ता. बदनापूर, जि. जालना या कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान संबंधित कंपनीच्या सोयाबीन बियाण्याच्या पिशव्यांवर “Best Quality Guaranteed – 100% Satisfaction” असा दावा करण्यात आल्याचे आढळून आले. कृषी विभागाच्या मते, हा दावा बियाणे नियम 1968 मधील नियम 10 च्या तरतुदींना धरून नसून ग्राहकांची दिशाभूल करणारा आहे.
याशिवाय संबंधित बियाणे हे सत्यतादर्शक (Truthfully Labelled) प्रकारातील असल्याने त्याच्या उत्पादन, पॅकिंग आणि सीलिंग प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंपनीची असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955, बियाणे कायदा, बियाणे नियम 1968 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गुन्ह्याची नोंद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पृथ्वीराज इंगळे यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल श्याम अघाव करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)









