छत्रपती संभाजीनगर | (युवा क्रांती वृत्तसेवा) : 21 जुलै 2026 – मराठवाड्यात यंदाचा मान्सून अपेक्षेप्रमाणे सक्रिय न झाल्याने खरीप हंगामावर संकटाचे सावट गडद होत आहे. पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, पेरणी झालेल्या पिकांसमोरही अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. २० जुलैपर्यंत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या केवळ ३१.५० टक्के पावसाची नोंद झाली आहे.
कृषी विभागाच्या उपलब्ध माहितीनुसार, या तीन जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामातील सुमारे ७९ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांतील पिकांची उगवण समाधानकारक झालेली नाही. काही ठिकाणी पिके सुकण्याच्या मार्गावर असून, तर अनेक भागांमध्ये पुरेशा ओलाव्याअभावी पेरणीची कामे अद्यापही अपूर्ण आहेत.
सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद या प्रमुख खरीप पिकांना सध्या नियमित आणि समाधानकारक पावसाची नितांत आवश्यकता आहे. पुढील काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास उभ्या पिकांचे मोठे नुकसान होण्याबरोबरच अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
यंदाच्या हंगामाकडून मोठ्या अपेक्षा बाळगून शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली असली, तरी सध्या त्यांचे संपूर्ण लक्ष आकाशाकडे लागले आहे. येत्या काही दिवसांत मान्सून सक्रिय झाला तर पिकांना नवसंजीवनी मिळू शकते; अन्यथा उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत असून खरीप हंगामाचे भवितव्य पुढील पावसावरच अवलंबून असल्याचे चित्र आहे.









