एएसआय रंजन तेलंग यांची सतर्कता; समुपदेशनानंतर बालकल्याण समितीच्या परवानगीने बालकाची आईकडे सुपूर्दगी!
शेगाव I (डी.ललित) : दि. २३ : आई रागावल्याच्या कारणावरून अकोला येथून घरातून न सांगता निघून आलेल्या १५ वर्षीय बालकाला शेगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) सतर्कतेमुळे सुरक्षितपणे त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले.
शेगाव रेल्वे स्थानकावरील स्टेशन प्रबंधक मोहन देशपांडे यांनी स्थानकावर संशयास्पद अवस्थेत फिरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाकडे लक्ष गेले. त्याच्या चेहऱ्यावरील घाबरलेले हावभाव पाहून त्यांनी तत्काळ रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक उपनिरीक्षक (एएसआय) रंजन तेलंग यांना याची माहिती दिली.
माहिती मिळताच एएसआय रंजन तेलंग यांनी घटनास्थळी जाऊन मुलाला ताब्यात घेतले व त्याची विचारपूस केली. त्यावेळी आई रागावल्यामुळे कोणालाही न सांगता अकोल्याहून शेगावला आल्याची कबुली बालकाने दिली.
यानंतर तेलंग यांनी मुलाकडून त्याच्या आईचा मोबाईल क्रमांक घेऊन तातडीने संपर्क साधला. मुलगा सुरक्षित असल्याची माहिती मिळताच त्याची आई तात्काळ अकोल्यावरून शेगाव येथे दाखल झाली. मुलाला समोर पाहताच आईला आनंदाश्रू अनावर झाले.
त्यानंतर एएसआय रंजन तेलंग यांनी बालकाचे समुपदेशन केले. तसेच बालकल्याण समितीची आवश्यक परवानगी घेऊन सर्व कायदेशीर व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बालकाला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले.
आपल्या मुलाची सुखरूप भेट घडवून आणल्याबद्दल बालकाच्या आईने रेल्वे सुरक्षा बल तसेच एएसआय रंजन तेलंग यांचे मनःपूर्वक आभार मानले.(युवा क्रांती वृत्तसेवा)









