शेगाव, (डी ललित) : दि. २३ जुलै-दिल्ली येथे पेपरफुटी प्रकरणाविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला शेगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली शांततापूर्ण बंद आंदोलन व मोर्चा काढण्यात आला.
सकाळी सुमारे १० वाजता मंदिर परिसरातून आंदोलनाची सुरुवात झाली. आंदोलनकर्त्यांनी व्यापारी व नागरिकांना शांततेच्या मार्गाने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान सुरू असलेल्या काही दुकानांनीही आंदोलनकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद केली.
हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मोहम्मद सलमान यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. शहरातून मार्गक्रमण केल्यानंतर मोर्चा शेगाव–खामगाव मार्गे तहसील कार्यालयात पोहोचला. तेथे शासनाच्या नावे निवेदन सादर करून आंदोलनाची सांगता करण्यात आली.
आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे संपूर्ण आंदोलन शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. (युवा क्रांती वृत्तसेवा)










