---Advertisement---

Buldhana News: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर केंद्रीय राज्यमंत्री Prataprao Jadhav; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश!!

---Advertisement---

बुलढाणा | (डी ललित) : (जिमाका): बुलढाणा जिल्ह्यात ३० व ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील गावांची केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीचा आढावा घेत त्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.

गेल्या दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर प्रतापराव जाधव यांनी ३१ जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला आवश्यक खबरदारीच्या सूचना दिल्या होत्या.

शनिवारी दि. १ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी चावरा, इलोरा, मडाखेड खुर्द, मडाखेड बुद्रुक, काजेगाव, बोराळा बुद्रुक, बोराळा खुर्द, खेर्डा खुर्द, खेर्डा बुद्रुक, चांगेफळ, रुधाणा आणि वकाणा या गावांना भेट देत शेतपिके, शेती आणि घरांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तसेच घरांच्या पडझडीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून बाधितांना शासनाची मदत वेळेत मिळावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पाहणीदरम्यान तहसीलदार पवन पाटील, अजाबराव वाघ, कृषी अधिकारी रमेश वाघ, गटशिक्षणाधिकारी ऐश्वर्या कोरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment